KBC, Rohit Sharma: 'कौन बनगे करोडपती'च्या यंदाच्या सीझनमध्ये आपण क्रिकेट विश्वातील दिग्गज मंडळी देखील उपस्थित राहताना दिसत आहेत. नुकतंच सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी केबीसीमध्ये उपस्थिती लावली होती. तर नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश देखील केसीबीमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे क्रीडा चाहत्यांसाठी केबीसीमध्ये यंदा विशेष महत्त्व दिल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या भागात केबीसीचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला एक जबरदस्त सरप्राईज दिलं की जे पाहून स्पर्धकाला अश्रू अनावर झाले.
केबीसीच्या सेटवर हॉटसीटवर पोहोचलेला प्रांशु नावाचा स्पर्धक भारतीय क्रिकेट स्टार रोहित शर्मा याचा मोठा चाहता असल्याचं अमिताभ बच्चन यांना कळालं. मग काय शो सुरू असतानाच रोहित शर्मा याला व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि प्रांशु याची व्हर्च्युअल भेट करुन देण्यात आली. रोहित शर्माला पाहून प्रांशु खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. आज साक्षात माझ्या देवाचं मला दर्शन झालं अशा भावना प्रांशुनं व्यक्त केल्या. रोहित शर्मानं प्रांशुला गुडलक भेट म्हणून त्यानं स्वाक्षरी केलेले मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ह्ज भेट म्हणून पाठवून देणार असल्याचं सांगितलं. केबीसीच्या सेटवर येऊन एक स्वप्न पूर्ण झालं आणि त्याच सेटवर माझं दुसरं स्वप्न देखील पूर्ण झालं, अशी भावना प्रांशुनं व्यक्त केली.
प्रांशुचं रोहित शर्मा प्रती असलेलं प्रेम पाहून अमिताभ बच्चन यांनी त्याला कोड्यात टाकणारा एक प्रश्न विचारला. रोहित शर्मा की तुझी गर्लफ्रेंड दोघांपैकी कुणाला प्राधान्य देशील? असं अमिताभ यांनी प्रांशुला विचारला असता त्यानं तुम्ही तर मला ७ कोटींच्या प्रश्नापेक्षाही खूप कठीण प्रश्न विचारला सर, असं म्हणत प्रांशुनं दोघांचही आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिलं. हा एपिसोड गुरुवारी टेलिव्हिजनवर टेलिकास्ट झाला. प्रांशुनं यात ५० लाख रुपये जिंकले. १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नाही. रोहित शर्मा सध्या आयपीएलसाठी यूएईमध्ये असून त्यानं आपल्या हॉटेल रुममधूनच केसीबीच्या सेटवर व्हिडिओ कॉल केला होता.
Read in English
Web Title: ipl Watch Rohit Sharma surprises fan on KBC set with video call gifts him his signed Mumbai Indians gloves
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.