नवी दिल्ली, आयपीएल : कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डी'व्हिलियर्स ही क्रिकेट जगतातील मान्यवर फलंदाजांची त्रिमूर्ती आरसीबीकडे आहे. पण आरसीबीला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आतापर्यंत संघाचे नेतृत्व कोहलीकडेच आहे, पण कोहलीला आरसीबीचे जेतेपद पटकावण्यात अपयश आले आहे. त्यामुळे कोहलीच्या जागी जर कोणी दुसऱ्या खेळाडूकडे संघाचे न्तृत्व सोपवले तर जेतेपद पटकावता येईल का, याचा विचार आरसीबीचे संघ व्यवस्थापन करत आहे.
आरसीबीच्या संचालकपदी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर हेसन यांनी आरसीबीविषयीच्या काही गोष्टींबाबत आपली मतं व्यक्त केली. यावेळी त्यांनी कोहलीच्या नेतृत्वाबद्दलही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
कोहलीबाबत हेसन म्हणाले की, " आतापर्यंत आरसीबीच्या कर्णधारपदी कोहली आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण कोहलीचे संघावर चांगले नियंत्रण आहे. तो गेल्या काही चुकांमधून शिकल्याचेही पाहायला मिळाले आहे. पण सध्या तरी संघात आम्हाला नेतृत्व बदल करायचा नाही. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तो निर्णय घेऊ. "