Join us  

‘आयपीएल‘ला वेळेची शिस्त लागणार तरी कधी?; सामने विलंबाने संपण्याचा प्रेक्षकांना फटका

‘आयपीएल’चा थरार सध्या पूर्ण रंगात आलेला आहे. आतापर्यंत झालेले सामने खूप अटीतटीचे होते. काही तर एकदम रोमांचक वळणावर संपले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 9:49 AM

Open in App

मतीन खानस्पोर्ट्‌स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह‘आयपीएल’चा थरार सध्या पूर्ण रंगात आलेला आहे. आतापर्यंत झालेले सामने खूप अटीतटीचे होते. काही तर एकदम रोमांचक वळणावर संपले. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत कळायला मार्ग नव्हता की, या सामन्यात नक्की जिंकणार तरी कोण? पण असे असले, तरी या स्पर्धेच्या शित्तबद्धतेविषयी चिंता निर्माण व्हायला लागली आहे. कारण कुठलाच सामना रात्री ११.३० च्या आधी संपताना दिसत नाही. काही सामने तर ११.४५ पर्यंत चालले. यासंदर्भात ‘स्लो ओव्हर रेट’साठी तीन संघांचे कर्णधार लोकेश राहुल, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी १२ लाखांचा दंडसुद्धा झाला; पण तरीसुद्धा एक प्रश्न अनुत्तरित राहतोच तो म्हणजे सामने संपायला नेमका उशीर कशामुळे होतो आहे.

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये काही नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्याअंतर्गत कर्णधारांना वाइड आणि नो-बॉलसाठी ‘डीआरएस’ घेण्याची अनुमती देण्यात आली. मात्र, बरेचदा ‘डीआरएस’ शिल्लक आहे म्हणून कर्णधार याचा वाइड आणि नो-बॉलसाठी वापर करताना दिसतात. हे त्यांनाही माहीत असतं की, यामुळे पंचांंनी दिलेला निर्णय बदलणार नाही. तरीसुद्धा ‘डीआरएस’चा आधार घेतला जातो. 

दुसरीकडे मैदानी पंचसुद्धा तिसऱ्या पंचांवर अतिजास्त विसंबून राहायला लागले आहेत. खासकरून धावबादच्या अपीलमध्ये तिसरे पंच प्रत्येक अँगलने रिप्ले बघतात. त्यामुळे निर्णय येईपर्यंत बराच वेळ निघून जातो. याव्यतिरिक्तसुद्धा स्टम्पिंग किंवा पायचीतच्या अपीलवर निर्णय देण्यास तिसऱ्या पंचांना बराच वेळ लागतो. या सर्व कारणांमुळेच कुठलेच सामने ठरलेल्या वेळेत संपताना दिसत नाहीत.

सामन्यांना विलंब होण्याचा फटका खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना बसतो आहे. कारण सामना रात्री १२ ला संपल्यानंतर प्रेक्षकांना घरी पोहोचण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. मोठ्या शहरांमध्ये बरेचदा सार्वजनिक परिवहन व्यवस्था रात्र उशिरा बंद झालेली असते. अशावेळी दुप्पट भाडे देऊन खासगी वाहनाने रात्री दोनपर्यंत प्रेक्षक कसेबसे घरी पोहोचतात; पण लगेच दुसऱ्या दिवशी लवकर उठून कामावरही जायचे असते. त्यामुळे नीट झोपसुद्धा होत नाही. अशा रीतीने सामने उशिरा संपण्याचा मनस्ताप दुसऱ्या दिवसापर्यंत प्रेक्षकांना सहन करावा लागतो. यामुळे सामना अर्धा तास आधी सुरू करण्याबाबत ‘बीसीसीआय’ने गंभीरपणे विचार करायला हवा. कारण केवळ कर्णधारांना दंडित करून सामने वेळेवर संपणार नाहीत. तसे १२ लाखांच्या दंडाचा खेळाडूंनासुद्धा फारसा फरक पडत नाही. ही रक्कम त्यांच्यासाठी फार किरकोळ आहे.

हमेशा देर कर देता हूँ मैं हर काम करने मेंज़रूरी बात कहनी हो कोई वादा निभाना हो उसे आवाज़ देनी हो उसे वापस बुलाना हो हमेशा देर कर देता हूँ मैं     - मुनीर नियाजी

या आहेत वेळा९०-९०     मिनिटे प्रत्येक डाव२.५-२.५     मिनिटांचे एकूण चार स्ट्रेटेजिक टाइम आउट१०     मिनिटांचा दोन्ही डावांदरम्यान ब्रेक२००     मिनिटे (३ तास २० मिनिटे) एकूण७.३०     सामना सुरू होण्याची वेळ१०.५०     सामना संपण्याची वेळ

२० षटके पूर्ण करायला लागतात २ तास!‘आयपीएल’च्या नियमानुसार १० वाजून ५० मिनिटांनी सामना संपणे अपेक्षित आहे; पण असे एकदा तरी झाले का? मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात तर आरसीबीच्या गोलंदाजांनी २० षटके पूर्ण करण्यासाठी पूर्ण दोन तास लावले. चेन्नईविरुद्धसुद्धा गुजरातने याचीच पुनरावृत्ती केली. या लेटलतिफीवर राजस्थानच्या जोस बटरलने नाराजी व्यक्त केली होती. खेळाचा वेग वाढायला हवा, या आशयाचे ट्वीट करून बटलरने सर्वांचे लक्ष वेधले होते. 

Open in App