Manoj Tiwary Retirement : बंगाल क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा फलंदाज मनोज तिवारीने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मनोज तिवारीने भारतासाठी १२ वन डे आणि ३ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने भारताकडून जुलै २०१५ मध्ये खेळला होता. त्याने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १२ सामन्यांमध्ये २६.०९च्या सरासरीने २८७ धावा केल्या आणि त्यात नाबाद १०४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचबरोबर त्याने २०११मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली होती.
सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट करत मनोजने लिहिले की, 'धन्यवाद.' आतापर्यंत तो खेळाबरोबरच राजकारणातही सक्रिय होता. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये तो क्रीडा मंत्री आहे. गेल्या मोसमात, त्याने क्रीडा मंत्री म्हणून बंगाल रणजी संघाचे नेतृत्व केले आणि संघाला रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत नेले, तरीही तो विजेता होऊ शकला नाही. मनोजने २००६-०७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी दाखवून बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघात स्थान मिळवले आणि पदार्पण करण्यासाठी तो सज्ज झाला. पण सामन्याच्या एक दिवस आधी क्षेत्ररक्षणाच्या सरावात त्याला दुखापत झाली. दोन वर्षांनंतर, त्याने ऑस्ट्रेलियात पदार्पण केले आणि ते सपशेल अपयशी ठरला.
२०११मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले वन डे शतक झळकावले. मात्र यानंतर तो अनेक महिने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. शतक झळकावल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी त्याला खेळण्याची संधी मिळाली. तो भारताकडून अखेरचा झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारीचा रेकॉर्ड मजबूत आहे आणि तो १९ वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय राहिला. त्याने बंगालसाठी १४१ प्रथम श्रेणी सामन्यांत ४८.५६ च्या सरासरीने ९९०८ धावा केल्या आहेत. त्यात २० शतकं व ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. १६९ लिस्ट ए सामन्यांमध्ये ४२.२८ च्या सरासरीने ५५८१ धावा आणि १८३ ट्वेंटी-२० सामन्यांत १५ अर्धशतकांच्या मदतीने ३४३६ धावा केल्या. तो आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा भाग होता. २०१२ च्या KKRच्या विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर एकूण १०० + विकेट्स आहेत.