यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. केकेआरच्या एका खेळाडूवर बीसीसीआयने बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते.
केकेआरच्या या खेळाडूला बीसीसीआयने चांगलेच फटकारले आहे. बीसीसीआयचे काही नियम आहेत आणि भारतात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे पालन करायचे असते. पण या खेळाडूने पालन न केल्यामुळेच बीसीसीआयने त्याला शिक्षा केली आहे.
केकेआरने २० लाख रुपये एवढी किंमत मोजत महाराष्ट्राच्या प्रवीण तांबेला आपल्या संघात दाखल करून घेतले होते. पण बीसीसीआयचा नियम मोडल्यामुळे आता त्याला यंदाच्या आयपीएलला मुकावे लागणार आहे. प्रवीणचे वय ४८ वर्षे असून यंदाच्या मोसमात तो खेळला नाही तर त्याची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
प्रवीण हा अबुधाबी येथील टी-१० स्पर्धा खेळायला गेला होता. पण ही स्पर्धा खेळण्यापूर्वी त्याने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. परदेशात कोणताही सामना किंवा स्पर्धा खेळायची असल्यास संबंधित खेळाडूला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागले. पण ही स्पर्धा खेळण्यापूर्वी प्रवीणने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती.
याबाबत आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले की, " जर कोणत्याही खेळाडूला परदेशात खेळायचे असेल तर त्याला राज्य संघटनेबरोबरच बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते. पण प्रवीणने अबुधाबी येथील स्पर्धा खेळताना बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रवीणला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळता येणार नाही."