अबूधाबी : कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच लढतीत मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या इयोन मॉर्गन सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत रविवारी फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षेने मैदानात उतरणार आहे.
केकेआरतर्फे आघाडीच्या फळीतील शुभमान गिलला चांगल्या सुरुवातीचा लाभ घेता आलेला नाही तर राहुल त्रिपाठी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध ८१ धावांची शानदार खेळी केल्यानंतर अपयशी ठरला आहे. नितीश राणा, कार्तिक व आंद्रे रसेल यांनाही प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. सनरायजर्सने आठ पैकी केवळ तीन सामन्यात विजय मिळविला आहे. गुणतालिकेत हा संघ पाचव्या स्थानी आहे. या संघाची भिस्त आघाडीच्या फळीतील चार फलंदाज जॉनी बेयरस्टो, कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विलियम्सन यांच्यावर अवलंबून आहे.