Mumbai Indians Batting, IPL 2024 MI vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सच्या संघाला १७० धावांचे आव्हान दिले. व्यंकटेश अय्यर (७०) आणि मनिष पांडे (४२) यांच्या ८७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाताने १९.५ षटकांत १६९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ घरच्या मैदानावर सहज लक्ष्य गाठेल असा अंदाज होता. पण मुंबईचे अनुभवी फलंदाज मैदानात नुसते हजेरी लावून परतले. त्यामुळेच मुंबईची अवस्था ११ षटकांच्या खेळापर्यंत ६ बाद ७१ अशी झाली. (Rohit Sharma Hardik Pandya)
इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सलामीला फलंदाजीसाठी आलेला रोहित शर्मा आणि इशान किशन या जोडीला फार चांगली सुरुवात देता आली नाही. इशान किशन ७ चेंडूत १३ धावा तर रोहित शर्मा १२ चेंडूत ११ धावांवर बाद झाला. पुढे नमन धीर ११ चेंडूत ११ धावांवर माघारी परतला. तर नेहाल वढेराही ११ चेंडूत ६ धावांवर बाद झाला. अनुभवी तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या कमाल करतील अशी अपेक्षा होती. पण तिलक वर्मा ४ तर हार्दिक पांड्या १ धाव काढून माघारी परतला. कोणालाही खेळपट्टीवर फार काळ तग धरता आले नाही. त्यामुळेच ११ षटकांचा खेळ संपेपर्यंत मुंबईची अवस्था ६ बाद ७१ अशी झाली होती.
त्याआधी, कोलकाताच्या डावाची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्टने ५, अंगक्रिशने १३, श्रेयस अय्यरने ६ तर सुनील नारायणचा ५ धावा केल्या. त्यानंतर रिंकू सिंगही ९ धावांवर बाद झाला. या धक्क्यांनंतर मनिष पांडे आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने डाव सावरला. या दोघांनी ८७ धावांची भागीदारी केल्यानंतर जोडी फुटली. मग आलेला आंद्रे रसेलही धावबाद झाला. रसेल पाठोपाठ रमणदीप सिंग (२), मिचेल स्टार्क (०) हे दोघेही बाद झाले. व्यंकटेश अय्यर शेवटपर्यंत झुंज देत होता. ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या. बुमराहने त्याला त्रिफळाचीत करत कोलकाताचा डाव १६९ धावांवर संपवला. मुंबई इंडियन्सकडून नुवान तुषारा, जसप्रीत बुमराहने ३-३, हार्दिक पांड्याने २ तर पियुष चावलाने १ गडी बाद केला.