रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: 'संघ व्यवस्थापनाने माझ्या अनुभवाची दखल घेतलीच असणार. मुंबईत परतल्यानंतर मी दोन स्पर्धाद्वारे केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला. याद्वारे मी निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला. हीच कामगिरी पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न राहिल,' असे मुंबईचा अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड याने 'लोकमत'ला सांगितले. सिद्धेश २०२२-२३ चे सत्र गोव्याकडून खेळल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकडे परतला आहे. पुनरागमनानंतर तो पहिल्यांदाच इराणी चषक लढतीद्वारे मुंबईकडून प्रथम श्रेणी सामना खेळेल. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान मुंबई संघ शेष भारत संघाविरुद्ध इराणी चषकासाठी भिडेल. सिद्धेशने आतापर्यंत ६७ प्रथम श्रेणी सामने खेळताना ३६.६९ च्या सरासरीने ४२४७ धावा काढल्या असून त्याने ८ शतके आणि २७ अर्धशतकेही झळकावली आहे.
मुंबईला अनेकदा कठीण परिस्थितीतून बाहेर काढल्याने सिद्धेशला मुंबईचा संकटमोचक म्हटले जाते. सिद्धेशने इराणी लढतीबाबत सांगितले की, 'शेष भारत मजबूत संघ आहे, पण त्यांचा सामना मुंबईविरुद्ध असल्याने त्यांच्यापुढेही सोपे आव्हान नसेल. मुंबईतील सर्वच खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ असून मानसिकदृष्ट्या संघ अत्यंत मजबूत आहे. शेष भारत संघातून देशभरातील आघाडीचे खेळाडू खेळतील, पण एक संघ म्हणून खेळताना कोणालाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे मुंबईची बाजू काहीशी वरचढ आहे. अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू संघात आहेत. तर काहीजण भारतीय संघाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे या सामन्यात मजाही येईल.'
मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तोमर, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.