नागपूर : विदर्भाचा संघ पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे आणि या इतिहासाचा शिल्पकार ठरू शकतो तो म्हणजे वसिम जाफर. इराणी चषक स्पर्धेत आपल्या दमदार खेळीने जाफरने शेष भारत संघाची गोलंदाजी किती बोथट आहे हे देखवून दिले. पण 40 वर्षांच्या जाफरचे त्रिशतक यावेळी मात्र फक्त 14 धावांनी हुकले. सध्याच्या घडीला विदर्भाने 5 बाद 691 अशी मजल मारली आहे.
या सामन्यात विदर्भाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. सलामीवीर जाफर फलंदाजीला आला. आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांनी जाफरने गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जाफरने शतक पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशी त्याने द्विशतक साजरे केले. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जाफर आपले त्रिशतक साजरे करणार असे साऱ्यांनाच वाटले होते. पण फक्त 14 धावांनी यावेळी त्याचे त्रिशतक हुकले.
दुसऱ्या दिवशी जाफर 285 धावांवर खेळत होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी तो पंधरा धावा करत एका नव्या विक्रमाला गवसणी घालेल, असे वाटले होते. पण तिसऱ्या दिवशी मात्र जाफरला फक्त एका धावेचीच भर घालता आली. जाफरने 34 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 386 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. इराणी चषक स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जाफरने आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने 18 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे.