Join us  

Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?

जर सामना अनिर्णित राहिला तर कुणाला मिळेल ट्रॉफी? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 11:11 AM

Open in App

Irani Cup MUM vs ROI Winner : इराणी चषक २०२४ साठी रंगलेल्या मुंबई विरुद्ध शेष भारत यांच्यातील सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवसाच्या खेळात मुंबईच्या संघाने ३०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा दबदबा दिसून आला. पहिल्या डावात मुंबईच्या संघाने ५३७ धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसऱ्या डावात २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

MUM vs ROI सामना अनिर्णित राहण्याच्या दिशेनं

अखेरच्या दिवशी शेष भारत संघासमोर ३०० पेक्षा अधिक धावंचे टार्गेट असणार हे स्पष्ट दिसत आहे. शेष भारत संघाने याआधी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून दाखवला आहे. पण वेळ कमी असल्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यताच अधिक आहे. आता या परिस्थिती ट्रॉफी कुणाची असा प्रश्न निर्माण होता. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास माहिती

अजिंक्य की, ऋतुराज? सामना ड्रॉ झाला तर ट्रॉफी कोण उचलणार?  

जर इराणी कप स्पर्धेतील अखेरच्या दिवशी सामना ड्रॉ म्हणजेच अनिर्णित राहिला तर मुंबईच्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल. अर्थात सामना अनिर्णित राखूनही ट्रॉफी मुंबई संघाची होईल. कारण इराणी चषकमधील नियमानुसार, सामना अनिर्णित राहिल्यास पहिल्या डावात ज्या संघाकडे आघाडी होती तो संघ विजेता ठरतो. त्यामुळे देशांतर्गत प्रथम श्रेणी मॅचमधील जेतेपदाच्या शर्यतीत अजिंक्य रहाणे युवा ऋतुराजवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. तोच या स्पर्धेची ट्रॉफी उंचावेल.

मुंबईच्या संघाने दाखवला क्लास शो!  

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई विरुद्ध ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील शेष भारत यांच्यातील सामन्यात मुंबईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली होती. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या भात्यातून आलेल्या ९७ धावांच्या खेळीनंतर सर्फराज खान याने द्विशतक झळकावले होते. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघान पहिल्या डावात ५३७ धावा केल्या होत्या. दुसरीकडे शेष भारत संघाकडून अभिमन्यू ईश्वरन याने १९१ धावांची खेळी केली. त्याला ध्रुव जुरेलची उत्तम साथही मिळाली. पण शेष भारत संघ पहिल्या डावात फक्त ४१६ धावांपर्यंत मजल मारू शकला होता. त्यामुळे मुंबईच्या संघाला पहिल्या डावात १२१ धावांची आघाडी मिळाली. सामना अनिर्णित राहिल्यास याच आघाडीच्या जोरावर मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाहणे ट्रॉफी उंचावताना दिसेल.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघअजिंक्य रहाणेऋतुराज गायकवाडमुंबई