आयर्लंडच्या संघाने शनिवारी एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी विजय मिळवला. त्याबरोबरच भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यासारख्या दिग्गज कसोटी देशांना मागे टाकत आयर्लंड हा सर्वात लवकर कसोटी विजय मिळवणारा सहावा देश ठरला आहे. २०१८ मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यानंतर आयर्लंडने सहा वर्षे आणि ८ कसोटी सामन्यानंतर आपला पहिला कसोटी विजय मिळवण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडविरुद्ध १८७७ मध्ये पहिल्याच कसोटी सामन्यात आपला पहिला कसोटी विजय मिळवला होता. तर इंग्लंड आणि पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिला विजय मिळवला होता. मात्र भारताला पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली होती. भारताला त्याच्या २५ व्या सामन्यातत इंग्लंडविरुद्ध हा विजय मिळवला होता. तर दक्षिण आफ्रिकेने १२ सामने खेळल्यानंतर आपला पहिला कसोटी विजय मिळवला होता. तर न्यूझीलंडने ४५ व्या सामन्यात आपला पहिला कसोटी विजय मिळवला होता.
विजयासाठी आवश्यक १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाचा डाव सुरुवातीलाच अडखळला. तसेच त्यांची अवस्था ३ बाद १३ अशी झाली. मात्र कर्णधार अँडा बालबर्नी याच्या नाबाद ५८ धावा आणि लोर्कन टकरच्या २७ धावांच्या खेळीच्या जोरावर आयर्लंडने विजयी लक्ष्य गाठले. तत्पूर्वी बॅरी मॅकार्थी, मार्क अडायर आणि क्रेग यंग यांच्या भेदक माऱ्याने अफगाणिस्तानला दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.