Ireland vs India, 2nd T20I : दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांच्या १७६ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारताने ७ बाद २२५ धावांचा डोंगर उभा केला. पण, या तगड्या लक्ष्यासमोर आयर्लंडचे खेळाडू चाचपडले नाही. पॉल स्टर्लिंग, कर्णधार अँडी बलबर्नी, हॅरी टेक्टर व जॉर्ट डॉकरेल यांनी तोडीसतोड खेळ केला. आयर्लंडनेभारतीय गोलंदाजांना टफ फाईट देताना सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा बनवला. भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या क्षणी विकेट घेत सामन्याचे चित्र बदलले अन् टीम इंडियाने २-० अशी मालिका जिंकली. आयर्लंडने कडवी टक्कर देताना दोनशेपार मजर मारली.
प्रत्युत्तरात आयर्लंडकडून आक्रमक सुरुवात झाली. अनुभवी पॉल स्टर्लिंग व कर्णधार अँडी बलबर्नी यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ७३ धावा चोपल्या. स्टर्लिंगने १८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४० धावा कुटल्या. रवी बिश्नोनीने त्याला सहाव्या षटकात बाद केले. त्यानंतर अँडीची फटकेबाजी सुरू झाली आणि आयर्लंडने ९ षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या आहेत. हर्षल पटेलने भारताला मोठी विकेट मिळवून दिली. अँडी ३७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ६० धावा करून माघारी परतला. गॅरेथ डेलनीन ( ०) रन आऊट झाला.
पहिल्या सामन्यात हिट ठरलेली हॅरी टेक्टर व लोर्कन टकर ही खेळपट्टीवर होती. उम्रान मलिकने ही जोडी तोडताना पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. टकर ( ६) झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या जॉर्ज डॉकरेलने १५व्या षटकात रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर १७ धावा कुटल्या. आयर्लंडला ३० चेंडूंत ६२ धावा करायच्या होत्या. टेक्टर व डॉकरेल यांनी हर्षल पटेलने टाकलेल्या १७व्या षटकात १४ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने ही २१ चेंडूंवरील ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणताना टेक्टरला ३९ ( २८ चेंडू, ५ चौकार) धावांवर माघारी पाठवले. भुवीने त्या षटकात ७ धावा दिल्या. आयर्लंडला १२ चेंडूंत ३१ धावा हव्या होत्या. आयर्लंडने या सामन्यात १३ वा षटकार खेचून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. यापूर्वी २०१७ मध्ये त्यांनी अफगाणिस्तानविरुद्ध १२ षटकार खेचले होते.