IRE vs IND, 2nd T20I : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली आयर्लंड येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने पहिली ट्वेंटी-२० लढत सहज जिंकली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला सामना १२-१२ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होणाऱ्या लढतीला पावसामुळे ११.२० वाजले. पावसाने जवळपास दोन-अडीच तास बॅटिंग केली. आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे संकट आहे. पण, तुर्तास तरी पावसाने दांडी मारलेली दिसतेय आणि हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या ट्वेंटी-२०त हॅरी टेक्टरच्या ३३ चेंडूंतील ६४ धावांच्या जोरावर आयर्लंडने १०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवी, हार्दिक, आवेश व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. प्रत्युत्तरात भारताच्या इशान किशनने ११ चेंडूंत २६ धावा केल्या. सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाला. हार्दिकनेही १२ चेंडूंत २४ धावा केल्या. दीपक २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४७ धावांवर नाबाद राहिला. ऋतुराजच्या पोटरीत दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजीला आला नाही, असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले.
ऋतुराज गायकवाडच्या पोटरीला दुखापत झाल्याने तो या सामन्याला मुकला आहे आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली गेली आहे. हर्षल पटेल व रवी बिश्नोई यांना संघात स्थान मिळाले असून आवेश खान व युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली गेली आहे.