Ireland vs Pakistan : पाकिस्तानी संघ आयर्लंड दौऱ्यावर असून, तिथे तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. शुक्रवारी या मालिकेतील पहिला सामना खेळवला गेला. नाणेफेक जिंकून यजमान आयर्लंडने पाहुण्या पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने संथ गतीने अर्धशतक झळकावले, त्याला सैय अयुबने चांगली साथ दिली. अखेर पाकिस्तानी संघ निर्धारित २० षटकांत ६ बाद १८२ धावा करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी चांगली खेळी केली.
पाकिस्तानकडून अखेरच्या काही षटकांमध्ये इफ्तिखार अहमदने स्फोटक खेळी केली. त्याने १५ चेंडूत ३७ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने दिलेल्या १८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या फलंदाजांनी पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीपासून स्फोटक खेळी करून नवख्या आयर्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडला.
अखेरच्या षटकापर्यंत रंगला थरार
आयर्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात ११ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानकडून शेवटचे षटक अब्बास आफ्रिदी टाकत होता. पहिल्याच चेंडूवर चौकार गेल्याने ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. मग एक चेंडू निर्धाव गेला. ४ चेंडूत ७ धावा हव्या असताना २ धावा काढण्यात आयर्लंडला यश आले. मग ३ चेंडूत ५ धावांची गरज होती. मग चौकार गेला अन् यजमानांनी विजयाच्या दिशेने कूच केली. अखेरच्या २ चेंडूत केवळ एका धावेची गरज होती. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर १ धाव काढून आयर्लंडने विजयी सलामी दिली.
आयर्लंडकडून अँड्यू बलबिरनीने सर्वाधिक (७७) धावा केल्या, तर हेरी टेक्टर (३६) आणि जॉर्ज डोकरेल (२४) धावा करून बाद झाला. बलबिरनीने २ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ५५ चेंडूत ७७ धावा चोपल्या. अखेर आयर्लंडने १९.५ षटकांत ५ बाद १८३ धावा करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पाकिस्तानकडून अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक (२) बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि इमाद वसीम यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
पाकिस्तानचा संघ -
बाबर आझम (कर्णधार), सैय अयुब, मोहम्मद रिझवान, फखर झमान, आझम खान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, इमाद वसीम, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी.
आयर्लंडचा संघ -
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्यू बलबिरनी, लोर्कन टकर, हॅरी टेक्टर, जॉर्ज डोकरेल, गॅरेथ डेलानी, कर्टिक केम्फ, मार्क अडेर, बॅरी मॅकार्थी, क्रेक यंग, बेन व्हाइट.
Web Title: IRE vs PAK 1st T20I Ireland defeated Pakistan's World Cup team by 1 ball and 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.