IRE vs PAK : आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला एका अतिउत्साही चाहत्याच्या उर्मटपणाचा सामना करावा लागला. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. रविवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळवला गेला. यावेळी आफ्रिदीला एका अतिउत्साही चाहत्याने शिवीगाळ केल्याचे समजते. संबंधित चाहता अफगाणिस्तानचा असून, त्याने शाहीनसमोर अपशब्द वापरले. अपशब्द कानावर पडताच शाहीन आफ्रिदीने तिथे थांबून सुरक्षा रक्षकांच्या मदतीने संबंधित चाहत्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सामन्यानंतर ही घटना घडली असल्याचे कळते. खरे तर अनेकदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे चाहते भिडल्याचे निदर्शनास आले आहे. मागील ट्वेंटी-२० विश्वचषकात याचा प्रत्यय पाहायला मिळाला होता.
दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहतेच नाही तर राष्ट्रीय संघातील खेळाडूंमधील संघर्ष देखील जगजाहीर आहे. लाईव्ह सामन्यात दोन्हीही देशातील खेळाडू भिडल्याचे पाहायला मिळाले आहे. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहीन आफ्रिदी नाराज असल्याचे दिसते. तो संबंधित चाहत्यावर नाराजी व्यक्त करत असून, सुरक्षा रक्षक मध्यस्थी करत आहेत. वाद घालत असलेल्या चाहत्याच्या हातात अफगाणिस्तानचा झेंडा आहे.
आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात शाहीनने तीन बळी घेतले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या ३०० बळींचा टप्पा गाठला. तो ३०० बळी घेणारा १२ वा पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या सामन्यात मोठा विजय मिळवून पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.