T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघाला आयर्लंडसारख्या नवख्या संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात चीतपट केले. पाकिस्तानी संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून, तिथे तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान संघाने विजयी सलामी दिली. पाकिस्तानच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर क्रिकेट विश्वात त्यांची फजिती होत आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाने आपल्या संघाला घरचा आहेर देत सडकून टीका केली. पाकिस्तानला अमेरिकेसारखा संघ देखील पराभूत करेल, अशी भीती त्याने व्यक्त केली.
रमीझ राजा म्हणाला की, पाकिस्तान आयर्लंडविरूद्ध धावांचा बचाव करू शकत नाही. संघाचे संतुलन बिघडले आहे. पाकिस्तान अशाने विश्वचषक कसा जिंकेल? तुम्हाला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या तगड्या संघांचा सामना करायचा आहे. मला तर आता असे वाटते की, पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० विश्वचषकात अमेरिकेकडून देखील पराभूत होऊ शकतो. त्यांचा संघ पाकिस्तानला आव्हान देईल यात शंका नाही.
पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव पाकिस्तानला नमवून आयर्लंडने क्रिकेट विश्वाला धक्का दिला. पाकिस्तानने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांनी चमक दाखवली. आयर्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात ११ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानकडून शेवटचे षटक अब्बास आफ्रिदी टाकत होता. पहिल्याच चेंडूवर चौकार गेल्याने ५ चेंडूत ७ धावांची गरज होती. मग एक चेंडू निर्धाव गेला. ४ चेंडूत ७ धावा हव्या असताना २ धावा काढण्यात आयर्लंडला यश आले. मग ३ चेंडूत ५ धावांची गरज होती. मग चौकार गेला अन् यजमानांनी विजयाच्या दिशेने कूच केली. अखेरच्या २ चेंडूत केवळ एका धावेची गरज होती. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर १ धाव काढून आयर्लंडने विजयी सलामी दिली.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ