नवी दिल्ली : आयर्लंडचा (Ireland) ऑलराउंडर खेळाडू केविन ओ ब्रायनने (Kevin O'Brien) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधील आयर्लंडच्या संघातील प्रमुख फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. केविन ओ ब्रायनचे आयर्लंडच्या क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. लक्षणीय बाब म्हणजे विश्वचषकात सर्वाधिक वेगाने शतक ठोकण्याचा विक्रम ब्रायनच्या नावावर आहे. या शतकी खेळीमुळेच तो जगभर प्रसिद्ध झाला होता. त्याने वयाच्या २२ व्या वर्षी २००६ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचा भाऊ नील ओ ब्रायन याने २०१८ मध्ये क्रिकेटला रामराम केले होते.
इंग्लंडविरूद्ध ठोकले होते शतक
ब्रायनने बंगळुरूच्या धरतीवर २०११ विश्वचषकात इंग्लंडविरूद्ध शानदार शतक झळकावले होते. केवळ ५० चेंडूत शतकीय खेळी करून त्याने विश्वचषकात इतिहास रचला. त्या सामन्यात ६० चेंडूत ११३ धावा करून ब्रायनने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला होता. ब्रायनच्या या ताबडतोब खेळीच्या जोरावरच आयर्लंडने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केला होता. मोठी क्रिकेट कारकिर्द असलेल्या ब्रायनने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अनेक उल्लेखणीय खेळी केल्या आहेत.
ब्रायनने १५२ एकदिवसीय आणि १०९ टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे मोठी क्रिकेट कारकिर्द असताना देखील त्याने केवळ ३ कसोटी सामने खेळले असून यामध्ये २५८ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३,६१९ धावांची नोंद आहे, यामध्ये २ शतकांचा समावेश आहे. याशिवाय टी-२० मध्ये १,९७३ करून ब्रायनने आयर्लंड क्रिकेटचे नाव रोशन केले आहे. टी-२० देखील एक शतक झळकावून तो आयर्लंडच्या क्रिकेटचा प्रमुख चेहरा बनला होता. त्याने आपल्या एकूण क्रिकेट कारकिर्दीत २५० सामने खेळले असून ५,५५० धावा केल्या आहेत.
Web Title: Ireland all-rounder Kevin O'Brien announces retirement from international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.