इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मुळे न्यूझीलंडने त्यांची बी टीम पाकिस्तान दौऱ्यावर पाठवली होती आणि त्या टीमसमोरही पाकिस्तानचे वर्ल्ड कप खेळणारे शिलेदार अपयशी ठरले होते. आता आयर्लंडचा गोलंदाज जॉश लिटल ( Josh Little ) याने पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत न खेळता गुजरात टायटन्सच्या शेवटच्या सामन्यापर्यंत आयपीएलमध्ये खेळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आयर्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे आणि नेदरलँड्समध्ये तिरंगी मालिका खेळणार आहे. पण, लिटलने आयपीएल २०२४ ला प्राधान्य दिल्याचे वृत्त समोर येत आहे.
आयर्लंडच्या निवडकर्त्यांनी मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ जणांच्या प्राथमिक संघाची घोषणा केली. हे खेळाडू नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळले होते. हाच संघ शुक्रवारी डब्लिनमध्ये सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा सामना करेल, त्यानंतर १९ ते २४ मे दरम्यान नेदरलँड आणि स्कॉटलंडसोबत तिरंगी मालिका खेळेल. लिटलने शनिवारी आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात ४५ धावांत ४ बळी टिपले होते. गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता धोक्यात असताना बांगलादेशविरुद्ध वन डे मालिकेत सहभागी होण्यासाठी आयपीएलच्या मध्यभागी भारत सोडला. मात्र, त्याला या वर्षात पूर्ण आयपीएल खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आयर्लंडने ५ जून रोजी भारताविरुद्ध ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात करतील. दोन दिवसांनी त्यांचा सामना कॅनडाशी होईल. त्यानंतर ते १४ व १६ जून रोजी अनुक्रमे अमेरिका आणि पाकिस्तानचा सामना करतील.
पाकिस्तान T20I, नेदरलँड्स तिरंगी मालिका आणि T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयर्लंड संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँडी बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जॉश लिटल*, बॅरी मॅककार्थी, नील रॉक (wk), हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (wk), बेन व्हाईट, क्रेग यंग.