आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बड्या संघांना पराभवाचे धक्के देत सनसनाटी विजय मिळवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आयर्लंडच्या संघाने पुन्हा एकदा एका धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेत शुक्रवारी झालेल्या टी-२० सामन्यात आयर्लंडने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानवर ५ गडी राखून मात केली. अँडी बालबेर्नी याने केलेली ७७ धावांची खेळी आयर्लंडच्या विजयात महत्त्वाची ठरली. त्याबरोबरच आयर्लंडने टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान आयर्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार पॉल स्टर्लिंग (५) आणि लॉरेन्स टकर (४ ) हे ठराविक अंतराने बाद झाल्याने आयर्लंडची अवस्था २ बाद २७ अशी झाली. त्यानंतर अँडी बालबेर्नी (७७ धावा) आणि हॅरी टकर (३६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करून आयर्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. त्यानंतर जॉर्ज डॉकरेल (२४) गेराथ डेलनी (नाबाद १०) आणि कॅम्फर (नाबाद १५) यांनी झटप धावा जमवत आयर्लंडला अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मोहम्मद रिझवानच्या रूपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. मात्र सॅम आयुब (४५) आणि बाबर आझम (५७) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये इफ्तिकार अहमद ( नाबाद ३७) आणि शाहीन शाह आफ्रिदी ( नाबाद १४) यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला निर्धारित २० षटकांत ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारून दिली होती.