नवी दिल्ली : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण तुम्हाला जर प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला तर त्याचे नवल वाटून घेऊ नका. कारण एका संघाने इरफानला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.
इरफान हा चांगला स्विंग गोलंदाज होता. त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करायचा. पण फलंदाजीवर भर देण्याच्या नादात त्याच्या गोलंदाजीतील स्विंग हरवला आणि त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इरफान आणि त्याला भाऊ युसूफ यांनी अकादमीची स्थापना केली होती. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये इरफान हा समालोचकाची भूमिका पार पाडत आहे.
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघटनेने इरफानला मेंटक आणि कोच या पदासाठी नियुक्त केले आहे. संघटनेने आयपीएलमध्ये खेळत असलेल्या काही खेळाडूंबरोबर संवाद साधला. त्यानुसार संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला जम्मू आणि काश्मीर संघातील राखिस सलाम हा मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळत आहे. संघटनेने सलामला इरफानबाबत काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर संघटनेने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
जेकेसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिक बुखारी यांनी याबाबत सांगितले की, " आम्ही काही खेळाडूंकडून इरफानबाबत काही मते मागवून घेतली होती. खेळाडूंनी इरफानबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतरच आम्ही त्याल संघाचा मेंटर आणि कोच पदासाठी नियुक्त केले आहे."
इरफानने शेअर केले होते सिक्रेटइरफान आणि युसूफने एका कार्यक्रमात येऊन आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते दोघेच नेहमीच एकमेकांची खोडी काढत असत. युसूफने या कार्यक्रमात त्यांच्या लहानपणीचे अनेक सिक्रेटदेखील सगळ्यांना सांगितले. त्याने सांगितले, लहानपणी मी आणि इरफान दोघेही खूप मस्ती करत असू. पण वडिलांचा ओरडा नेहमी मीच खात असे. तसेच लहान असल्यापासूनच इरफानला व्यायामाची आवड होती. त्यामुळे तो अतिशय फिट होता. पण मी कधीच व्यायाम करण्यात रस न दाखवल्याने मला वडिलांचा ओरडा खावा लागत असे. पण याच व्यायामाचा इरफानला नेहमीच फायदा झाला. त्यामुळेच भारतीय टीममध्ये त्याला त्याची जागा बनवता आली असे देखील त्याने कबूल केले. इरफानमुळे मी देखील आता व्यायाम करायला लागलो आहे.