रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या (Road Safety World Series) उपांत्य फेरीत इंडिया लिजेंड्स संघानं वेस्ट इंडिज लिजेंड्स संघाचा १२ धावांनी पराभव केला. इंडिया लिजेंड्स संघाच्या विजयात संघातील अनेकांचा महत्वाचा वाटा राहिला. पण यात इरफान पठाणच्या गोलंदाजीची जास्त चर्चा झाली. इरफाननं त्याची पहिली ओव्हर खराब टाकली. ओव्हरमध्ये ६ चेंडूऐवजी त्याला तब्बल ११ चेंडू टाकावे लागले. पण सचिननं इरफानला मार्गदर्शन केलं आणि बघता बघता इरफाननं सामन्यात पुनरागमन केलं. इंडिया लिजेंड्सच्या विजयात इरफानच्या जबरदस्त गोलंदाजीचाही सिंहाचा वाटा राहिला.
इरफाननं ११ चेंडूंची एक ओव्हर टाकलीइरफान पठाणची पहिली ओव्हर अतिशय खराब गेली. त्यानं स्वत: हे मान्य देखील केलं. "मी आतापर्यंतची सर्वात खराब गोलंदाजी केली", असं इरफान म्हणाला. त्यानं एकाच षटकात ५ वाईड बॉल टाकले. त्यामुळे इरफानला एकाच ओव्हरमध्ये तब्बल ११ चेंडू टाकावे लागले.
पहिल्या ओव्हरमध्ये १९ धावा, नंतर कमबॅकसेमी फायनलच्या सामन्यात इरफान पठाणने ४ ओव्हर्समध्ये ४८ धावा दिल्या. यात पहिल्याच ओव्हरमध्ये इरफाननं १९ धावा दिल्या होत्या. त्यानंतरच्या तीन ओव्हर्समध्ये इरफाननं पुनरागमन केलं. पुढच्या तीन ओव्हर्समध्ये त्यानं २९ धावा दिल्या.
सचिननं दिला कानमंत्रइरफानची पहिली ओव्हर खराब गेल्यानंतर सचिन त्याच्या जवळ आला आणि त्याला आत्मविश्वास दिला. सचिनच्या म्हणण्यानुसार इरफाननं धैर्य न सोडता गोलंदाजी केली आणि सामन्यात मोक्याच्या क्षणी खतरनाक ठरणाऱ्या स्मिथला त्यानं माघारी धाडलं. सचिननं दिलेल्या आत्मविश्वासाबाबत इरफाननं ट्विट करुन आभार देखील व्यक्त केले.
"एक खराब ओव्हर तुमचा आत्मविश्वास तोडू शकत नाही. तू अजूनही सामना जिंकून देऊ शकतोस", असं सचिननं जवळ येऊन सांगितल्याचं इरफाननं ट्विट केलं आहे. सचिननं दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे संघ चांगली कामगिरी करू शकला आणि आम्ही जिंकलो, असं इरफान म्हणाला.