Irfan Pathan Mumbai Airport: 'टीम इंडिया'चा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि त्याच्या कुटुंबाला एका विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले. विमानतळावर प्रशासनाला उत्तर देताना इरफानच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामना करावा लागल्याची घटना घडली. इरफान आणि त्याच्या कुटुंबाला वाईट वागणूक मिळाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. इरफान आणि त्याचे कुटुंबीय यांना विस्टाराच्या चेक-इन काऊंटरवर सुमारे दीड तास उभे ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. खुद्द इरफान पठाणने हे आरोप केले आहेत. इरफानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने यासंबंधीचा खुलासा केला. इरफानने सांगितले की, या प्रकार घडला त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी आणि दोन मुले होती.
ट्विटरवर पोस्ट शेअर करताना इरफान पठाणने लिहिले की, 'आज (बुधवार) मी मुंबईहून दुबई विस्टारा फ्लाइट UK-201 ला निघालो होतो. दरम्यान, चेक-इन काऊंटरवर मला वाईट वागणूक देण्यात आली. विस्ताराने माझ्या कन्फर्म तिकिटात फेरफार केला. ही समस्या सोडवण्यासाठी मला दीड तास काऊंटरवर ताटकळत उभे राहावे लागले. माझ्यासोबत माझी पत्नी आणि दोन मुले (एक ५ वर्षांचे, एक ८ महिन्यांचे) होती.
इरफान पठाण बुधवारी (२४ ऑगस्ट) कुटुंबासह दुबईला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला होता. येथून त्याला उड्डाण करायचे होते. या दरम्यान त्याला विमानतळावर वाईट वागणूक देण्यात आली. इरफान पठाणचा आशिया कप २०२२ च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे. २७ ऑगस्टपासून यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू होत आहे. यासाठी इरफान दुबईला रवाना होत होता, त्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.