ICC T20 World Cup 2024: जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आयपीएल २०२४ ची स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी करून आपापल्या राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी सर्वच देशातील खेळाडू प्रयत्नशील आहेत. (T20 World Cup 2024 Team India) भारतीय संघाला आगामी स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. वन डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला होता. त्यामुळे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान रोहितसेनेसमोर असेल. (T20 World Cup News)
भारत ट्वेंटी-२० विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळेल असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. अशातच भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ निवडला. त्याने काही युवा खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात संधी द्यायला हवी असे सुचवले. पठाणने १२ सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.
सूर्या, अर्शदीपला वगळले
इरफानने सांगितले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे विश्वचषकाच्या संघात असतील यात शंका नाही. पण, यष्टीरक्षक कोण असेल याबाबत निर्णय घेणे कठीण आहे. कारण रिषभ पंत मोठ्या कालावधीनंतर मैदानात परतला आहे. जितेश शर्मा आहे पण त्याच्याकडे फारसा अनुभव नाही. लोकेश राहुल देखील या जागेसाठी एक पर्याय असू शकतो. पठाण 'एसपीएन क्रिकइंफो'च्या टाइमआउट शोवर बोलत होता.
याशिवाय इरफानने वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंगच्या जागी मोहसिन खानला संधी दिली. तर अन्य दोन वेगवान गोलंदाजांमध्ये त्याने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर विश्वास दाखवला. सोबतच फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांची नावे त्याने सुचवली.
इरफानने निवडलेला भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, जितेश शर्मा, लोकेश राहुल, मोहसिन खान, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई.
Web Title: Irfan Pathan has named Team India squad for ICC T20 World Cup 2024, leaving out Suryakumar Yadav, Shreyas Iyer and Arshdeep Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.