कोरोना व्हायसरमुळे देशात मागील अडीच महिने देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. आता अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण, अजूनही क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास परवानगी मिळालेली नाही. इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) भविष्य अधांतरी आहे. आयपीएल होत नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या छोट्या छोट्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी ( CSK) मोची काम करणाऱ्या आर भास्करन यांच्यावरही आर्थिक संकट ओढावले. त्यांच्या मदतीला भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण पुढे आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात इरफान आणि युसूफ पठाण यांनी अनेकांना मदत केली. या दोघांनी सुरुवातीला हॉस्पिटलला मास्कचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी गरजूंना दहा हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दान केले. आता इरफानने आणखी एक सकारात्मक कार्य केले. CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना आर्थिक मदत केली. भास्करन १९९३ पासून एमए चिदंबरम स्टेडियमवर क्रिकेट सामने पाहत आहेत. मागील १२ वर्षापासून ते CSK संघाशी जोडले गेले आहेत. ते संघाचे अधिकृत मोची आहेत.
आयपीएलमध्ये ते प्रती दिवस १००० आणि अन्य दिवशी ते ५०० रुपये कमावतात. पण लॉकडाऊनच्या काळात त्यांना १५० रुपयेही कमावता येत नाही आणि त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. हे वृत्त जेव्हा इरफानला समजले तेव्हा त्याने लगेच मदत केली. त्याने भास्करन यांचा नंबर मागवून घेतला आणि त्याला २५ हजारांची मदत केली.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.