भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी याने त्याची फेव्हरिट प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा होणार आहे आणि स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना इरफानने त्याची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. इरफानने निवडलेल्या 11 खेळाडूंमध्ये रिषभ पंत, श्रेयस अय्यर, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांना स्थान मिळालेले नाही.
इरफानने त्याच्या वर्ल्ड कप संघातील अव्वल तीन स्थानांत लोकेश राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली यांची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियात वळणाऱ्या चेंडूंचा सामना करण्यासाठी हे त्रिकुट सक्षम असल्याचे मत त्याने व्यक्त केले. शिवाय या तिघांकडेही चांगला अनुभव आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव व दिनेश कार्तिक यांना मधल्या फळीत त्याने निवडले आहे.
श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमारला आणि रिषभ पंतच्या जागी यष्टिरक्षक दिनेशची निवड त्याने केली आहे. हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू इरफानच्या संघात आहेत. दरम्यान, गोलंदाजी विभागात हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांची निवड इरफानने केलीय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने मोहम्मद शमीला वगळले आहे.
इरफान पठाणचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप साठीची प्लेईंग इलेव्हन - लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह ( Irfan's India XI for T20 World Cup: KL Rahul, Rohit Sharma (captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Hardik Pandya, Dinesh Karthik (wk), Ravindra Jadeja, Harshal Patel, Bhuvneshwar Kumar, Yuzvendra Chahal, Jasprit Bumrah. )
रिषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकची निवड का?रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांचा सध्याचा फॉर्म पाहता इरफानने कार्तिकची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत रिषभने 14.25 च्या सरासरीने 57 धावा केल्या, दुसरीकडे कार्तिकने फिनिशरची भूमिका चोख बजावली. इरफानने त्याच्या संघात एकच फिरकीपटू निवडला आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या जलदगती गोलंदाजांना साथ देणाऱ्या असल्याने इरफानने हा निर्णय घेतला.