Mohammad Kaif Irfan Pathan: भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याची जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणना होते. कव्हर्सवर क्षेत्ररक्षण करताना चेंडू त्याच्या हातून निसटल्याचे क्षण चाहत्यांना क्वचितच पाहायला मिळाले. कैफ बॅटनेही शानदार खेळी खेळण्यात पटाईत होता. २००२ च्या नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये कैफने नाबाद अर्धशतक झळकावून भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्याची ती खेळी आणि सौरव गांगुलीचे शर्ट फिरवणं कोणताही क्रिकेटप्रेमी विसरूच शकणार नाही. पण सध्या मोहम्मद कैफ एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
मोहम्मद कैफ गोलंदाजी करू शकते हे फार कमी लोकांना माहिती आहे. इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात सुरू असलेल्या लीजेंड्स लीग क्रिकेट सामना सुरू होता. वेगवान गोलंदाज अशोक दिंडा दुखापतीमुळे षटकातील उर्वरित चार चेंडू टाकू शकला नसल्याने कैफला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. गोलंदाजीमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा घेत कैफने वर्ल्ड जायंट्सचा फलंदाज थिसारा परेराला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर शॉर्ट थर्ड मॅनकरवी झेलबाद केले. मोहम्मद कैफ विकेट घेतल्यानंतर भलताच खुश झाला. त्याने विकेट घेण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्यात कॅप्शनमध्ये त्याने सौरव गांगुलीला टॅग करत मजेशीर पद्धतीने लिहिले, 'कृपया अष्टपैलू मोहम्मद कैफचा ड्रिफ्ट, फ्लाइट आणि टर्न पहा. दादा, तुम्ही मला गोलंदाजीची संधी न देऊन चुकलात असं वाटत नाही का?'
दरम्यान, मोहम्मद कैफचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मोहम्मद कैफच्या या व्हिडिओवर कमेंट करताना इरफान पठाणने लिहिले, 'तुझ्या गोलंदाजीची खिल्ली उडवल्याबद्दल माफी मागतो.' त्या माफीचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या सामन्यात कैफ आणि इरफान पठाण इंडिया महाराजा संघाकडून खेळत होते. मात्र, इरफान पठाणने कैफची कधी खिल्ली उडवली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इरफान पठाणच्या कमेंटला उत्तर देताना मोहम्मद कैफ म्हणाला, 'तू काय म्हणालास, मला काही गोष्टी मुद्दाम ऐकू येत नाहीत.'