Irfan Pathan on Virat Kohli: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता तो संघात फक्त स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरूद्ध ६ फेब्रुवारीपासून क्रिकेट मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. त्यामुळे रोहितच्या नेतृत्वाखाली विराट कोहली कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल. त्या दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने विराटबद्दल एक मोठं विधान केलं आहे.
"विराट कोहली या क्रिकेट मालिकेत संघाचा कर्णधार नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो जरी कर्णधार नसला तरी हरकत नाही. विराट हा नेतृत्वाच्या बाबतीत उत्तम आहे. त्याच्यात एक चांगला 'लीडर' आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की जोपर्यंत विराट कोहली संघात असेल तोपर्यंत विराट कोहली नक्कीच कर्णधारपदाबाबत रोहित शर्माला मार्गदर्शन करत राहिल", असं इरफान पठाण म्हणाला.
"विराट कोहली जेव्हा कर्णधार होता त्यावेळी विराटने फिटनेसला विशेष महत्त्व दिले आणि भारतीय संघात अनेक चांगले पायंडे पाडले. विराटचा स्वभाव खूपच मदतशील आहे. त्यामुळे विराट नक्कीच सर्वांना मदत करेल. तो कर्णधार नसला तरी तो रोहितला संघाच्या नेतृत्वाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी त्याला सांगेल आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा त्याला मार्गदर्शन करेल. प्रत्येक कर्णधार आपल्या संघाला पुढे घेऊन जातो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण सगळ्यांचा प्रयत्न सारखाच असतो. विराट कोहलीच्या नेतृत्वात आक्रमकता आणि ऊर्जेचा संचार होता. तर रोहितच्या नेतृत्वात शांत आणि संयमीपणा दिसेल", असा फरक पठाणने सांगितला.
दुसऱ्या एखाद्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळायला काहीच हरकत नसल्याचं विराटने आधीच सांगितलं आहे. विराट म्हणाला होता की नेतृत्व करण्यासाठी संघाचा कर्णधारच असायला हवं असं काही नाही. तुम्हाला जर एखादा खेळ नीट कळत असेल तर तुम्ही त्या खेळाचे मास्टर होऊ शकता आणि इतरांनाही सुधारणा करण्यासाठी मदत करू शकता.