Hardik Pandya T20 World Cup 2024, Team India: IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या अडचणी काही केल्या संपायचं नाव घेत नाहीयेत. सुरुवातीला तीन सामने हरल्यानंतर मुंबई विजयपथावर परतली होती. पण नंतर ती विजयी लय कायम राखण्यात मुंबई इंडियन्सला अद्याप म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सकडून ९ विकेट्सने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला या सामन्यानंतर अनेक प्रकारच्या टीकांचा सामना करावा लागला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात सातत्याने अपयशी ठरत असलेला मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यापुढे आता IPL सोबतच टी२० विश्वचषक स्पर्धा २०२४चे देखील आव्हान आहे. अशा परिस्थितीत त्याचा हा फॉर्म त्याच्यासाठीच धोक्याची घंटा ठरताना दिसत आहे.
यंदा जून महिन्यात T20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची निवड दिल्लीत होणार आहे. या निवडीच्या वेळी सिलेक्टर्स बरोबर कर्णधार रोहित शर्मा देखील बैठकीला उपस्थित असेल. पण ही बैठक होण्याआधीच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. संघ निवडीच्या वेळी हार्दिक पांड्याला संघात घेतल्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात असे सूचक विधान इरफान पठाणने केले आहे.
इरफान पठाण ने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, हार्दिक पांड्याच्या चेंडू टोलवण्याच्या सध्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. कारण त्याला ते फारसे जमताना दिसत नाही. भविष्यात या गोष्टीचा मोठा फटका त्याला आणि संघाला बसू शकतो. तसेच वानखेडे मैदानावर खेळताना हार्दिक वेगळ्या पद्धतीने खेळतो, पण इतर खेळपट्ट्यांवर मात्र त्याचा फॉर्म फारसा चांगला असल्याचे दिसत नाही. हा गोष्ट त्याच्यासाठी देखील अडचणीचा मुद्दा ठरू शकतो.
दरम्यान, हार्दिकने यंदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून गेल्या आठ सामन्यांमध्ये केवळ 151 धावा केल्या आहेत. त्यात 39 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. म्हणजेच गेल्या आठ सामन्यात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. तसेच त्याने आतापर्यंत केवळ सात षटकार लगावले आहेत. गोलंदाजीची आकडेवारी पाहता त्याला आठ सामन्यांत केवळ चार बळीच मिळवता आले आहेत. तसेच त्यांच्या गोलंदाजीच्या धावा देण्याची सरासरी ही 10 पेक्षा जास्त आहे.