भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने गुरुवारी केलेलं ट्विट सध्या गाजतंय... इरफानने भारत देशाप्रती त्याचे मत व्यक्त केले, परंतु ते व्यक्त करताना त्याने क्षमतेवर अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला आणि त्यावरून सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. काहींनी इरफानच्या या ट्विटचा संदर्भ दिल्लीत सध्या सुरु असलेल्या राजकीय घडमोडींशी जोडून त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा ( Amit Mishra) याने इरफानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ''माझा देश, माझा सुंदर देश, याच्याकडे जगातील सर्वोत्तम देश होण्याची क्षमता आहे, परंतु...'', असे ट्विट इरफानने केले.
काही तासांतच इरफानच्या या ट्विटला दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अमित मिश्रा याने उत्तर दिले. अमितने हे ट्विट करताना इरफानला टॅग केले नाही किंवा त्याचा उल्लेखही केला नाही. पण, अमितचे हे ट्विट इरफानसाठीच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमितने लिहिले की,''माझा देश, माझ्या सुंदर देशामध्ये पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता आहे….. जर काही लोकांना हे समजले की आपली राज्यघटनेचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.''