आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघ २२ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी पुन्हा मैदानावर उतरणार आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची ही पूर्वतयारी असणार आहे. पण, या मालिकेसाठी निवडलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती दिली गेली आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याला नजरंदाज केले. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) याने ट्विट करून त्याची नाराजी व्यक्त केली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संजू संघाचा भाग होता, परंतु त्याला फार काही करता आले नाही. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातूनही संजूला बाहेर बसवले. लोकेश राहुल व इशान किशन या दोन यष्टिरक्षकांना वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले. त्यात आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांच्या मालिकेतही संजूला संधी दिलेली नाही. ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंना पहिल्या दोन वन डे सामन्यात निवडले गेले आहे. यानंतर इरफानने ट्विट केले की,''मी सध्या संजू सॅमसनच्या जागी असतो तर खूप निराश झालो असतो.''
आर अश्विनचे संघात पुनरागमन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टिंमागे लोकेश राहुल व इशान किशन हे दोन स्पर्धक आहेत. त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शुबमन लिग यांचे स्थान कायम आहे. तिलक वर्माला पहिल्या दोन वन डे सामन्यात निवडले आहे. आर अश्विन भारताच्या वन डे संघात परतला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात अश्विनचे नाव नाही आणि त्याला आशिया चषक स्पर्धेतही खेळवले नाही. अक्षर पटेल्चाय दुखापतीमुळे अश्विनला संधी मिळाली.