भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण समाजकार्यात आघाडीवर असलेला पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी इरफान त्याच्यापरीनं मदत करत आहे. त्यानं भाऊ युसूफ पठाणसह 4000 माक्सचं वाटप केल, शिवाय गरजूंसाठी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाट्यांचही वाटप केलं. सामाजिक जाण राखताना इरफाननं समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचाही समाचार घेतला. भारताच्या गोलंदाजानं यापूर्वी मुस्लीम बांधवांना घरीच नमाज अदा करण्याचं आवाहन केलं होतं. आता त्यानं आणखी एक संकल्पना त्यांच्यासमोर ठेवली आहे.
2020च्या रमजानला गरजूंना मदत करण्याचं आवाहन त्यानं चाहत्यांना केलं आहे. त्यानं लिहीलं की,''या रमजानला गरीब आणि विधवांना त्यांचं कर्ज फेडण्यात मदत करा. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी पुढाकार घेऊन गरजूंना मदत करा. ज्या लोकांना जेवण मिळत नाही, ज्यांच्याकडे निवारा नाही किंवा ज्यांना उत्पन्न मिळत नाही, अशांना मदत करा. इस्लामिक समाजाचा रमजान हा पवित्र सण आहे. या कालावधीत जगभरातील मुस्लीम बांधव उपास करतात.''
इरफान पुढे म्हणाला,''विधवा आणि गरीब सध्या उधारीवर खरेदी करत आहेत. तुम्हाला ती रक्कम कमी वाटेल, परंतु त्यांच्यासाठी ते मोठं कर्ज आहे. शक्य झाल्यास ते कर्ज फेडा. तुम्हाला नसेल जमत तर ही कल्पना दुसऱ्यांना सांगा. कोणतरी त्यांचं कर्ज फेडेल.'' 23 एप्रिलला रमजानच्या महिन्याला सुरुवात होत आहे.