बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानचे आज निधन झाले. काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. क्रीडा विश्वातूनही त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
''इरफान खान यांच्या जाण्याच्या बातमीनं दुःख झालं. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी तो एक होता आणि त्याचे सर्व चित्रपट मी पाहीले. अंग्रेजी मीडियम हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. अगदी सहजपणे तो अभिनय करायचा. त्याच्या आत्म्याला शांती मिळो,'' असे ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं.
''इरफान खान यांच्या जाण्यानं प्रचंड दुःख झालं आहे. प्रचंड प्रतिभा आणि उच्च कॅलिबर असलेला तो खरा अभिनेता होता. त्याची आठवण मनात कायम राहील. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली,'' असे सुरेश रैनानं ट्विट केले.