Asia Cup 2022 : लोकेश राहुलचा ( KL Rahul) आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. पण, त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच.. मागील वर्षभरात दुखापतीमुळे लोकेश राहुल ९ मालिकांना मुकला आहे. त्यात आता त्याची निवड झालीय खरी, परंतु तो खेळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईला रवाना होण्यापूर्वी लोकेशला त्याची फिटनेस ( तंदुरुस्ती) सिद्ध करावी लागणार आहे. BCCI च्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) त्याची फिटनेस चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. BCCIची वैद्यकिय टीम ही चाचणी घेणार आहे.
आयपीएल २०२२नंतर लोकेश राहुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. दुखापत आणि कोरोनामुळे भारतीय संघाच्या उप कर्णधाराला अनेक मालिकांमधून माघार घ्यावी लागली. सूत्रांच्या माहितीनुसार लोकेश राहुल तंदुरुस्त झाला आहे, परंतु त्याला नियमाप्रमाणे फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. पुढील आठवड्यात BCCI चे फिजिओ ही चाचणी घेतील.''लोकेश राहुल हा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्यामुळेच त्याची आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पण, नियमानुसार त्याला NCA मध्ये तंदुरुस्तीची चाचणी द्यावी लागणार आहे,''असे बीसीसीआयने सांगितले.
लोकेश राहुल फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यास श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात येईल. आयपीएल २०२२नंतर लोकेश एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. चार महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि जूनमध्ये जर्मनीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जुलैपासून त्याने सरावाला सुरुवात केली. त्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या तंदुरुस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.