वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. कालच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत श्रीलंकेचा संपूर्ण संघ मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी ५५ धावांत तंबूत पाठवला. भारताने १९.४ षटकांत श्रीलंकेचा संघ माघारी पाठवून ३०२ धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या हा दबदबा पाहून पाकिस्तानला मिरच्या झोबल्याचे दिसतेय... पाकिस्तानच्या माजी स्टार खेळाडूने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. आयसीसी भारतीय गोलंदाजांना वेगळ्या प्रकारचा चेंडू देत असल्याचा दावा त्याने केला आहे.
८ मोठे विक्रम! मोहम्मद शमीची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी; रोहित शर्माची ठरला जगात भारी!
पाकिस्तानचा माजी खेळाडू हसन रझा ( Hasan Raza) याने भारतीय गोलंदाजांना सामन्यात दिल्या जाणाऱ्या चेंडूबाबत चौकशीची मागणी केली आहे. पाकिस्तानी चॅनेलवर त्याने ही मागणी केली आहे. आयसीसी किंवा अम्पायर नेमका कोणता चेंडू भारतीय संघाला देतोय, हे तपासायला हवं, असे तो भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यानंतर म्हणाला.
''शमी आणि सिराज हे गोलंदाज आम्ही ज्यांचा सामना केलाय अॅलेन डोनाल्ड व मखाया एनटीनी यांच्यासारखी गोलंदाजी करत आहेत. भारताविरुद्ध हे फलंदाजांची कामगिरी अशी का होतेय, हेच समजत नाही. चेंडू वेगाने येतोय आणि स्वींग होतोय. चेंडूच्या एकाबाजूला खूप शाईन दिसतेय. दुसऱ्या डावात चेंडू बदलला जातोय. आयसीसी किंवा तिसरा अम्पायर किंवा बीसीसीआय वेगळ्या प्रकारचा चेंडू भारतीय गोलंदाजांना देतोय. याचा तपास व्हायला हवा,''असे रझा म्हणाला. रझाने १९९६ ते २००५ या कालावधीत पाकिस्तानकडून ७ कसोटी व १६ वन डे सामने खेळले आहेत.
रझाच्या दाव्याचा भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने समाचार घेतला आहे. त्याने या चॅनेलवरील क्रिकेट शोवरच संशय व्यक्त केला.