इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव झाला. दिवसभरात 62 खेळाडूंवर बोली लागली आणि 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं रेकॉर्ड तोड कमाई केली. त्यानं 15.50 कोटीत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात एन्ट्री मारली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली होती. पण, यातील सर्वाधिक रक्कम ही ऑस्ट्रेलियाच्या स्पेशल 13 खेळाडूंसाठी मोजली गेली आहे. 29 अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंमधील एका खेळाडूची मात्र लॉटरी लागली आहे. त्याच्याकडे एका संघानं गोलंदाज सल्लागार आणि ऑपरेशन असिस्टंट ही जबाबदारी सोपवली आहे.
आयपीएल लिलावात एकूण 29 खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज इश सोढी याचाही समावेश होता. 75 लाख मूळ किंमत असलेल्या सोढीला एकाही संघानं घेण्यात रस दाखवला नाही. पण, त्याची थेट फिरकी गोलंदाज सल्लागारपदी वर्णी लागली आहे. राजस्थान रॉयल्स संघानं त्याच्या खांद्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सोढी राजस्थान रॉयल्सचे फिरकी गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुल्ले आणि मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर जॅक लश मॅकक्रम यांच्यासोबत काम करणार आहे.