Ishan Kishan BCCI Rule break: जेव्हा तुमच्यावर टीका होत असते, तेव्हा तुमच्या छोट्या-छोट्या चुकांकडेही सर्वांचे लक्ष जाते. टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनची परिस्थिती सध्या अशीच आहे. टीम इंडियातून ब्रेक मागितल्यापासून तो टीम इंडियात परतू शकलेला नाही. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविडच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, बीसीसीआयचे आदेशही पाळले नाहीत आणि आता त्याला सेंट्रल करारातून बाहेर फेकण्यात आले आहे. या सगळ्यामध्ये त्याची अशी एक चूक समोर आली आहे, ज्यामुळे तो पुन्हा बीसीसीआयच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२३ पासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला इशान किशन नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यांपासूनही दूर राहिला होता. आता तो मुंबईत होणाऱ्या डीवाय पाटील T20 स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतला आहे. त्याचे पुनरागमन फारसे चांगले झाले नाही. असे असताना आता त्याने 'बीसीसीआय'च्या एका प्रमुख नियमाकडे दुर्लक्ष केले, ज्यासाठी त्याला शिक्षा होऊ शकते.
ईशानने कोणता नियम तोडला?
या स्पर्धेत इशान किशन हा रिलायन्स 1 संघाकडून खेळत आहे, मात्र पहिल्या सामन्यात जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या हेल्मेटनेच अधिक लक्ष वेधले. ईशानच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो छापलेला होता आणि इथेच त्याने एक मोठा नियम मोडला. खरं तर, बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक कठोर नियम बनवला आहे की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंना हेल्मेट, जर्सी किंवा कोणत्याही उपकरणावर बीसीसीआयचा लोगो वापरता येणार नाही.
टीम इंडियाकडून खेळणारे खेळाडू अनेकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपापल्या संघाकडून खेळताना याचा वापर करतात. मात्र, काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर असे हेल्मेट घातलेले खेळाडू बीसीसीआयच्या लोगोवर टेप लावून ते लपवतात. ईशान किशनने मात्र तसे न करता बोर्डाचा लोगो असलेले हेल्मेट परिधान केले. अशा परिस्थितीत बीसीसीआय त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू शकते.
एक दिवस अगोदरच बोर्डाने इशानला यंदाच्या केंद्रीय करारातून वगळले. टीम इंडियामधून ब्रेक घेतल्यानंतर त्याला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळावे, असे आदेश दिले होते. परंतु ईशान त्याच्या झारखंड संघाचा भाग बनला नाही, त्यानंतर बोर्डाने त्याच्यावर ही कारवाई केली.