Ishan Kishan, Team India: टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. आता टीम इंडियाला काही दिवसांत श्रीलंकेविरुद्ध टी-20, एकदिवसीय मालिका खेळायची आहे. पण इशानला त्या दौऱ्यावर संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने धमाकेदार फटकेबाजी केली. इशानने वन डे क्रिकेटमध्ये २१० धावा करत पहिले द्विशतक ठोकले. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असताना प्लेइंग-11 मध्ये जागा रिकामी होती. त्याच्या जागी इशानला संधी मिळाली. पण पुढील दौऱ्यांवर त्याला संधी मिळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे.
इशानने द्विशतक ठोकले पण यासोबतच काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. आता जेव्हा श्रीलंका मालिका सुरू होईल तेव्हा इशान किशनला संधी मिळेल का? इशान किशन प्लेइंग-11 मध्ये आपले स्थान सुनिश्चित करू शकेल का? विश्वचषकाच्या तयारीत असलेली टीम इंडिया आता प्रत्येक मालिकेत आपली पूर्ण बेंच स्ट्रेन्थ चाचपून पाहत असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे.
ईशान किशनची जागा निश्चित नाही का?
ईशानने बांगलादेशविरुद्ध १३१ चेंडूत २१० धावांची खेळी केली. त्यात त्याने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. ते वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरले. पण टीम इंडियाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने या सामन्यानंतर प्रश्न उपस्थित केला आणि विचारले की श्रीलंका मालिकेसाठी शिखर धवन आता संघात कुठे दिसणार? ईशानला संघाबाहेर ठेवणे आता कठीण जाईल, असे दिनेश कार्तिकने सांगितले. शुभमन गिलही सतत धावा करत असल्याचे त्याने नमूद केले. याशिवाय रोहित शर्माचे पुनरागमन झाले, तर कुणाला तरी बाहेर बसावेच लागेल आणि अशा स्थितीत शिखर धवनवर ती टांगती तलवार असू शकते, अशी एक भिती त्याने बोलून दाखवली.
इशानने स्वत:च्या हिमतीवर केलं संधीचं सोनं!
इशान किशन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज आहे. जर त्याला प्लेइंग-11 मध्ये जागा मिळाली तर तो यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. निर्धारित षटकांच्या सामन्याच्या (वन डे आणि टी२०) फॉरमॅटमध्ये रिषभ पंतच्या कामगिरीवरही असेच प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याचवेळी तो बांगलादेश मालिकेतून बाहेर पडला आणि केएल राहुलने त्याच्या जागी किपिंग केली. अशा परिस्थितीत इशानला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळू शकते आणि केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळू शकतो, असाही एक अंदाज क्रिकेट जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
Web Title: Ishan Kishan double hundred still inclusion for next series in doubt sri lanka series Dinesh Karthik questions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.