Ishan Kishan IND vs BAN: बांगलादेशने घरच्या मैदानावर वन डे मालिकेत टीम इंडियाचा २-१ असा मालिका पराभव केला. भारताकडून पहिल्या दोनही सामन्यात सुमार कामगिरी झाल्यानंतर, तिसऱ्या सामन्यात स्टार क्रिकेटर इशान किशनने द्विशतक झळकावले. इशानच्या या कामगिरीवर भारतभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण असे असले तरी त्याच्या या यशानंतर त्याचे वडील प्रणवकुमार पांडे मात्र त्याच्याशी एक शब्दही बोलले नाहीत. आपल्या मुलाचं यश पाहून कोणत्याही वडीलांना त्याचं तोंडभरून कौतुक करावेसे वाटते. पण इशांतच्या वडीलांनी असं का केलं नाही, त्यामागचं नक्की कारण काय ते जाणून घेऊया.
इशान किशनने दमदार द्विशतक झळकावले. असे करत त्याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा या दिग्गज भारतीयांच्या पंगतीत स्थान मिळवले. तरीही इशानचे वडील मात्र त्याच्याशी बोलले नाहीत. असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. इशान किशन जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करतो, तेव्हा त्याचे वडील नेहमीच असे वागतात. प्रणव कुमार पांडे यांनी पाटणा येथून इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली. यासोबतच त्यांनी त्यामागचे कारणही सांगितले. यशस्वी होण्याची झिंग इशान किशनच्या डोक्यात जाऊ नये असे त्यांना वाटतं त्यामुळे ते त्याचं कौतुक करत नाहीत, असं ते म्हणाले. प्रणव कुमार पांडे म्हणाले, “तो जेव्हा शतक करतो तेव्हा मी जास्त बोलत नाही. जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतो. मला सामन्यानंतर त्याने जेव्हा कॉल केला. तेव्हा मी त्याला सांगितले की पुढच्या सामन्यात तू पुन्हा शून्यापासून सुरुवात कर. या द्विशतकाचा हँगओव्हर डोक्यात जाऊ देऊ नको."
प्रणव कुमार पांडेने सांगितले की, इशान किशन टी२० वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्याने खूप निराश झाला होता. यानंतर तो त्यांच्याशी बोलला. तो दु:खी होता. तो खूप तणावपूर्ण परिस्थितीत होता आणि मी त्याला असे कधीच पाहिले नव्हते. तो एक खेळकर प्रेमळ मुलगा आहे, परंतु जेव्हा त्याची निवड झाली नाही तेव्हा तो दुःखी होता. तो एकटा-एकटा राहायचा. पण अखेर त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.