ishan kishan news : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू इशान किशन सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्याचे वडील प्रणव कुमार पांडे यांनी राजकारणात प्रवेश केला असून, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल युनायटेडमध्ये त्यांनी प्रवेश केला. रविवारी पाटणा येथील जदयूच्या कार्यालयात नितीश कुमार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी प्रणव पांडे यांच्या शेकडो समर्थकांनीदेखील जदयूचा झेंडा हाती घेतला.
जदयूचे सदस्यत्व घेतल्यानंतर इशान किशनचे वडील प्रणव पांडे म्हणाले की, नितीश कुमार यांनी बिहारच्या विकासाला गती दिली आहे, बिहारच्या जनतेचा विकास झाला असेल तर तो नितीश कुमार यांच्यामुळेच. आम्ही त्यांच्या पक्षाचे सैनिक असून पक्षासोबत पूर्ण निष्ठेने काम करू. माझ्या मनात याबद्दल कोणतीही शंका नाही. तर, संजय झा यांनी सांगितले की, इशान किशनचे वडील सुरुवातीच्या काळात आमच्या पक्षाशी संबंधित होते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते काही काळ पक्षापासून दूर राहिले. किशनचे कुटुंब सुरुवातीपासून समता पक्षाचे सदस्य होते. दरम्यान, इशान किशनची मोठ्या कालावधीनंतर संघात एन्ट्री झाली आहे. टीम इंडिया ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात असेल. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात ३१ ऑक्टोबरपासून दोन प्रथम श्रेणी (चार दिवसीय) सामने खेळवले जातील.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ वेळापत्रकपहिला सामना - ३१ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर, मकायदुसरा सामना - ७ नोव्हेंबर-१० नोव्हेंबर, मेलबर्न भारत अ विरुद्ध वरिष्ठ भारतीय संघ, इन्ट्रा स्क्वॅड मॅच - १५-१७ नोव्हेंबर, पर्थ
भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियन.