Ishan Kishan mental fatigue (Marathi News) : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ट्वेंटी-२० मालिका ( १-१) बरोबरीत सोडवल्यानंतर टीम इंडियाने वन डे मालिकेत २-१ असा विजय मिळवला. आता भारतीय संघ २ सामन्यांची कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. पण, या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. मोहम्मद शमीची दुखापत वेळीच बरी झाली नाही आणि त्याने माघार घेतली. वन डे मालिकेत दुखापतग्रस्त झालेला ऋतुराज गायकवाडलाही माघार घ्यावी लागली. विराट कोहली कौटुंबिक कारणास्तव तातडीने मायदेशी परतला. इशान किशनही माघारी परतला आणि त्यामागचे कारण आता समोर आले आहे.
२५ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाजाला या वर्षी खास संधी मिळाली नाही. जवळपास प्रत्येक दौऱ्यात किंवा घरच्या मालिकेत तो संघासोबत असतो पण त्याला पुरेशी संधी मिळू शकलेली नाही. मालिकेत एखादा सामना किंवा एखाद्या खेळाडूने माघार घेतल्यास त्याला संधी मिळायची. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही तो शुबमन गिलच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघाचा सदस्य असलेला व एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या इशान किशननेही ( Ishan Kishan) त्याला रिलीज करण्याची विनंती BCCI कडे केली आणि ती मान्य झाली. इशान किशन या वर्षाच्या सुरुवातीपासून संघासोबत आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी तो भारताच्या संघाचा एक भाग होता, परंतु त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक थकव्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर असल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, बोर्डाने याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी खेळाडूंना मानसिक थकवा दूर करण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला होता. त्यांनी खेळाडूंनी आयपीएल खेळू नये, असे २०२० मध्ये म्हटले होते. भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा यानेही इशान किशनला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून टीका केली होती. इशानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील ३ सामन्यांमध्ये ३६.६७ च्या सरासरीने ११० धावा केल्या होत्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या सामन्यात खराब फलंदाजी आणि खराब यष्टिरक्षणानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग-११ मधून वगळले आणि त्याच्या जागी जितेश शर्माला खेळवले. इशानला बेंचवर बसवल्यामुळे अजय जडेजा संतापला होता