Ishan Kishan, ICC T20I Ranking : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली 0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. पाचवा सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने भारताला 2-2 अशा बरोबरीच्या निकालावर समाधान मानावे लागले. आयपीएल 2022मध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. या मालिकेत इशानने 200+ धावा केली आणि त्याचा फायदा त्याला आयसीसीच्या ट्वेंटी-20 रँकींगमध्ये झालेला पाहायला मिळाला. आयसीसीने बुधवारी ट्वेंटी-20 व कसोटी क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली. त्यात इशानने गरुड भरारी घेतली आहे. ट्वेंटी-20 फलंदाजांत टॉप टेनमध्ये तो एकमेव भारतीय आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशानने 41च्या सरासरीने सर्वाधिक 206 धावा केल्या होत्या. त्याने मागील आठवड्यात 68 स्थानांची झेप घेतली होती. आज इशानने ट्वेंटी-20 फलंदाजांत न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे याच्यासह संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे. डेव्हॉन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. डेव्हॉन व इशान यांचे प्रत्येकी 703 रेटींग पॉइंट्स आहेत आणि भारताकडून सर्वाधिक रेटींग पॉइंट्स इशानने पटकावले आहेत. दिनेश कार्तिकनेही 108व्या क्रमांकावरून थेट 87 क्रमांकावर झेप घेतली आहे.
पाकिस्तानचे बाबर आजम ( 818) व मोहम्मद रिझवान ( 794 ) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम, इंग्लंडचा डेवीड मलान व ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच यांचा क्रमांक येतो. ट्वेंटी-20 गोलंदाजांमध्ये टॉप टेनमध्ये एकही भारतीय नाही. युजवेंद्र चहल 23व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड, इंग्लंडचा आदील राशिद, अफगाणिस्तानचा राशिद खान हे टॉप थ्री आहेत.