नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा दारूण पराभव करून विजयी सलामी दिली होती. वेस्टइंडिजच्या संघाने पहिला सामना ६८ धावांनी गमावला मात्र टी-२० स्पेशलिस्ट म्हणून विंडीजच्या संघाची जगभर ख्याती आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल.
सूर्यकुमारच्या जागी किशनला मिळणार संधी?
भारतीय संघ जगातील अव्वल स्थानावरील टी-२० संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ एकापाठोपाठ एक मालिका जिंकत आला आहे, त्यामुळे रोहित सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. संघ कोणत्या फलंदाजावर अवलंबून नसला तरी दुसऱ्या टी-२० सामन्यात ईशन किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीच्या बाबतीत भाष्य करायचे झाले तर संघातील प्रमुख गोलंदाज बाहेर असले तरी युवा खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली आहे. अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी आपल्या ऑलराउंडर खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय संघ मागील काही सामन्यांपासून वेस्टइंडिजच्या संघावर वरचढ राहिला आहे. कारण मागील ५ सामन्यांमध्ये भारतीय संघाने नितांत वर्चस्व राखत विंडीजला पराभूत केले आहे. तर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात हे दोन्ही संघ २१ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामधील १४ सामने भारताने तर ६ सामने वेस्टइंडिजच्या संघाने जिंकले आहेत.
अशी असू शकते भारताची प्लेइंग XI
रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
Web Title: Ishan Kishan likely to replace Suryakumar in today's Ind vs WI match, Know Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.