Ishan Kishan BCCI: रणजी ट्रॉफी स्पर्धा काही खेळाडू खेळत नसल्याचे दिसत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI नाराज आहे. एकीकडे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारखे वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक जण शतके झळकावत आहेत, तर काही युवा खेळाडू आहेत टीम इंडियातून बाहेर असूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत नाहीत. रणजी ट्रॉफीपासून दूर राहणाऱ्या या खेळाडूंवर बीसीसीआय खूश नसून अशा खेळाडूंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. त्यातील चर्चेत असलेले नाव म्हणजे इशान किशन.
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यास सांगू इच्छित आहे जर ते फिट असतील. अनफिट खेळाडूंनी पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे असाही सल्ला BCCI देत आहे. “जानेवारीपासून IPL मोडमध्ये असलेल्या काही खेळाडूंबद्दल बोर्ड फारसे खूश नाही असे सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. येत्या काही दिवसांत सर्व खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत राज्य संघाकडून खेळण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. जे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर आहेत, अनफिट आहेत किंवा NCA मध्ये पुनर्वसन करत आहेत त्यांनाच सूट दिली जाईल.
इशान किशनवर कारवाई होणार?
अलीकडेच यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार नसल्याचे म्हणाला. त्यानंतर तो कर्णधार हार्दिक पांड्यासोबत बडोद्यात सराव करताना दिसला. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशानला संघात स्थान मिळाले नव्हते. मानसिक थकव्यामुळे त्याने विश्रांतीची मागणी केली होती आणि तेव्हापासून तो राष्ट्रीय संघात परतला नसल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान, इशान किशन संघात होत असलेल्या भेदभावामुळे खूश नसल्याचेही चर्चा झाली. या चर्चांमुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही नाराज होते. त्यानंतर आता राष्ट्रीय संघात परतणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. पण त्याने रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे आता BCCI च्या नोटीशीनंतर त्याचा काय परिणाम होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.