Ishan Kishan, IND vs SL : टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज इशान किशन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात सुरूवात केली होती. गोलंदाजांची धुलाई करत त्याने आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला. परिणामी IPL 2022 Mega Auction मध्ये त्याच्यावर मुंबईने १५ कोटी २५ लाखांची बोली लावत त्याला संघात घेतलं. पण त्यानंतर लगेचच खेळण्यात आलेल्या विंडिजविरूद्धच्या मालिकेत तो काहीसा गोंधळलेला दिसला. इशान किशनला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चांगलंच बांधून ठेवलं आणि फारशी फटकेबाजी करू दिली नाही. त्यामुळे इशानच्या उणीवा प्रतिस्पर्धी संघांना कळून चुकल्या. अशातच एका मुलाखतीत इशान किशनने, कोणत्या गोलंदाजाची गोलंदाजी खेळायला भीती वाटेल, याचं उत्तर दिलं.
काही विशिष्ट गोलंदाजांविरूद्ध इशान संघर्ष करताना दिसला. त्याच मुद्द्यावरून त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो किशन म्हणाला की इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यासारखे जे गोलंदाज असतील त्यांना खेळणं मला नकोसं वाटतं. "जोफ्रा आर्चरसारखे (Jofra Archer) गोलंदाज जास्त धोकादायक असतात. ते रनअप कमी घेतात पण त्यांला थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळतो. त्यांचा वेग आणि रनअप जुळत नाही. ते धावत हळू येतात. अगदी जॉगिंग केल्यासारखे येतात आणि चेंडू टाकतात. अशा गोलंदाजांना शॉट्स खेळणं खूप कठीण असतं. वन डे क्रिकेटमध्ये तुम्हाला एकेरी धावा काढून वेळ मारून येते. पण टी२० क्रिकेटमध्ये तुमच्याकडे तितका वेळ नसल्याने तसे गोलंदाज अडचणीचे ठरतात."
"आणखी बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे खूपच कठीण आणि तुमची कसोटी पाहणारे असते. कारण या क्रिकेटमध्ये कोणीही तुम्हाला फटके मारायला चेंडू टाकत नाही. तुम्हाला फटकेबाजी करायची असेल तर तुम्हाला स्वत:चा एक खास मार्ग शोधून काढावा लागतो. क्रीजमध्ये मागे पुढे होणं, क्रीजमधून पुढे येणं, क्रीज सोडून बाहेर जाऊन चेंडूंवर ताबा मिळवणं असा गोष्टी फलंदाजाला कराव्या लागतात. त्यामुळेच अशा वेळी आर्चरसारखे गोलंदाज अधिकच धोकादायक ठरतात", असं इशान किशन म्हणाला.