Join us  

Ishan Kishan Mini Helicopter Shot, IND vs SL 1st T20 : इशान किशनने मारला 'मिनी हेलिकॉप्टर' चौकार... तुम्ही पाहिलात का? (Video)

इशान किशनने धडाकेबाज खेळी करत ८९ धावा कुटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 9:09 PM

Open in App

India vs Sri Lanka 1st T20 : भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेला २०० धावांचे लक्ष्य दिले. इशान किशनच्या ८९ धावा, श्रेयस अय्यरच्या नाबाद ५७ आणि कर्णधार रोहित शर्माच्या ४४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकात २ बाद १९९ धावांपर्यंत मजल मारली. डावाच्या सुरूवातीपासून इशान किशनने आक्रमक पवित्रा घेतला आणि दमदार खेळी करून दाखवली. त्याची आजची ८९ धावांची खेळी ही भारतीय यष्टीरक्षकाने टी२० क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्यासोबतच इशान किशनच्या एका खास फटक्याचीही चर्चा रंगल्याचे दिसून आले.

इशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजाचा यथेच्छ समाचार घेतला. या दोघांनी १११ धावांची सलामी दिली. त्यानंतर रोहित ४४ धावांवर बाद झाला. पण इशानने फटकेबाजी सुरूच ठेवली. रोहित बाद होण्याच्या काही वेळ आधी दहाव्या षटकात इशानने एक खास फटका खेळला, त्याची चांगलीच चर्चा झाल्याची दिसून आली. महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर सिक्सर तर साऱ्यांनी बऱ्याच वेळा पाहिला आहे. पण इशान किशनने मात्र आजच्या सामन्यात मिनी हेलिकॉप्टर चौकार लगावला. पाहा व्हिडीओ-

दहाव्या षटकात इशान ३१ चेंडूत ५१ धावांवर खेळत होता. नुकतंच अर्धशतक साजरं केल्याने तो तुफान लयीत होता. त्याच वेळी त्याला पायाजवळचा एक चेंडू मिळाला. त्या चेंडूचा त्याने योग्य सदुपयोग केला. अतिशय खुबीने मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळत त्याने चेंडू बरोबर जमिनीलगत ठेवला आणि दोन फिल्डर्सच्या मधून सुंदर चौकार मिळवला.

दरम्यान, इशान किशनला शतक मात्र झळकावता आलं नाही. ५६ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ८९ धावा केल्या. अखेरीस दसून शनाका याने त्याला झेलबाद करत माघारी धाडले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाइशान किशनश्रेयस अय्यररोहित शर्मा
Open in App