IPL 2022 Mega Auction मध्ये मुंबई इंडियन्सने हंगामातील सर्वात महागडी बोली लावली. १२ आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरूला यंदाच्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. त्यात भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन याच्यावर सर्वात महागडी म्हणजेच १५ कोटी २५ लाखांची बोली लागली. मुंबई इंडियन्सने त्याचं नाव घेतल्यापासूनच त्याच्यावर बोली लावायला सुरूवात केली होती, पण आधी दिल्ली कॅपिटल्स आणि नंतर Kavya Maranच्या हैदराबाद संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला. त्यामुळे त्याच्यावरील बोली वाढतच गेली. पण अखेर मुंबई इंडियन्स सर्वोच्च बोली लावत त्याला संघात दाखल करून घेतलं. इशान किशनवर इतकी मोठी बोली लागल्याचे काहींना आश्चर्य वाटले तर काहींनी मुंबई इंडियन्सचे कौतुक केले. पण त्या घटनेनंतर इशान किशनला कसं वाटलं ते त्याने नुकतंच सांगितलं.
"मला खात्री होती की मुंबई इंडियन्स माझ्यावर बोली लावणार. त्यामुळे ती चिंता मला सतावत नव्हती. चिंतेचं कारण होतं ते म्हणजे वाढत जाणारी बोली. कारण मुंबईच्या संघाला पैसे वाचवायचे होते. इतर खेळाडूंना विकत घेऊन संघाची बांधणी करायची होती. त्यामुळे जेव्हा मुंबई इंडियन्सने इतकी मोठी बोली लावली तेव्हा एक क्षण माझ्या काळजाचा ठोकाच चुकला", असं इशान किशनने टीओआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
"मलादेखील मुंबई इंडियन्सच्या संघात यायचं होतं, त्यामागे काही कारणं आहेत. मला हा संघ नीट माहिती आहे. संघातील खेळाडू आणि इतर स्टाफही मला नीट ओळखतो. इतकेच नव्हे तर आमच्या संघाचे मालकही माझ्याशी खूप चांगला संवाद साधतात. मुंबई इंडियन्सची संघ म्हणून संस्कृती कशी आहे ते मला नीट माहिती आहे. मी या संघाचा, या कुटुंबाचा भाग होतो. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही संघात जायची मला इच्छा नव्हती", असं किशनने स्पष्ट केलं.
"गेली चार वर्षे मी या संघासोबत आहे. त्यांच्याशी माझं एक खास नातं तयार झालं आहे. मी संघात असताना आम्ही दोन विजेतेपदं मिळवली आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात साथ दिली आहे. त्यांना माझ्या क्रिकेटमधील कौशल्याबाबत माहिती आहे. आणि माझी या संघात नीट काळजी घेतली जाईल याची मला खात्री आहेत. त्यामुळे मला मुंबईच्या संघाव्यतिरिक्त इतर कुठेही जायचं नव्हतं", असं इशान म्हणाला.