Join us  

"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण

Hardik Pandya Ishan Kishan: हार्दिकला Mumbai Indians चे कर्णधारपद मिळाल्यावर फॅन्सने प्रचंड ट्रोल केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 7:00 PM

Open in App

Hardik Pandya Ishan Kishan Team India: भारतीय संघाने टी२० विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. १५व्या षटकापर्यंत सामन्यात पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला भारतीय गोलंदाजांनी अविश्वसनीय विजय मिळवून दिला. यात हार्दिक पांड्याने घेतलेले दोन महत्त्वाचे बळी आणि त्याने टाकलेली दोन महत्त्वपूर्ण षटके कोणीही विसरू शकणार नाही. काही महिन्यांपूर्वी IPL मध्ये मुंबईचे कर्णधारपद मिळाल्यावर हार्दिकला प्रचंड ट्रोल केले गेले, स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिडवण्यात आले. पण त्याच क्रिकेटप्रेमींनी विश्वविजेत्या हार्दिकला मात्र आता डोक्यावर उचलून घेतले. हा प्रवास खूपच चढ-उतारांचा होता. त्या वेळी हार्दिक काय विचार करत होता, याबद्दल त्याचा खास मित्र इशान किशन याने माहिती दिली.

गेल्या IPL आधी हार्दिक पांड्या गुजरातचा संघ सोडून मुंबईकडे आला. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून त्याला संघाचे नेतृत्व देण्यात आले. हा बदल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना रुचला नाही. त्यामुळे हार्दिकला IPL दरम्यान प्रचंड ट्रोल करण्यात आले. मुंबईच्या संघात रोहित आणि हार्दिक असे दोन गट पडल्याचेही बोलले जात होते. IPL दरम्यान आणि स्पर्धा संपल्यानंतरही इशान किशन हा हार्दिक पांड्यासोबत सातत्याने दिसायचा. खास मित्र म्हणून हार्दिकला इशानने कठीण काळात साथ दिली. याच काळाबद्दल इशान नुकताच बोलता झाला. हार्दिक त्याच्याशी काय बोलायचा हे त्याने सांगितले.

हार्दिक इशानला काय म्हणाला होता?

"IPL सुरु असताना हार्दिकला फॅन्सकडून खूप डिवचलं जात होतं. तेव्हा तो एकदा म्हणाला होता की, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याबद्दल विचार करण्यात काय अर्थ आहे, लोक चिडवत आहेत, ते असं का करत आहेत, या सगळ्यावर मी नियंत्रण ठेवू शकत नाही. मी जर याचाच विचार करत राहिलो तर मी खेळावर लक्ष देऊच शकणार नाही. आता मला लोकं शिव्या-शाप देत आहेत, पण लक्षात ठेव भविष्यात हीच लोकं माझं यश साजरं करत असतील. मला फक्त हा कठीण काळ खिलाडूवृत्तीने पार पाडायचा आहे. जे लोक आज शिव्या देतायत ते उद्या टाळ्या वाजवतील," या हार्दिकच्या शब्दांची इशानने माहिती दिली.

टॅग्स :हार्दिक पांड्याइशान किशनमुंबई इंडियन्सआयपीएल २०२४ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघ