रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेल्या संधीचं इशान किशनने ( Ishan Kishan) सोनं केलं. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात वेगवाग द्विशतक इशानने झळकावले आणि भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो चौथा फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्ध १३१ चेंडूंत २१० धावांची खेळी करून इशानने अनेक विक्रम नावावर केले. पाच दिवसांनी म्हणजेच आज रणजी करंडक स्पर्धेत ( Ranjji Trophy) त्याने झारखंडकडून शतक झळकावले. इशानच्या फटकेबाजीचा आज संजू सॅमसनच्या केरळा संघाला सामना करावा लागला.
नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक
प्रथम फलंदाजी करताना केरळ संघाने ४७५ धावा केल्या. अक्षय चंद्रनने २६८ चेंडूंत १५० धावांची खेळी केली. सिजोमोन जोसेफ ( ८३), रोहन प्रेम ( ७९), संजू सॅमसन ( ७२) आणि रोहन कुन्नुम्मल ( ५०) यांनी चांगली फलंदाजी केली. प्रत्युत्तरात झारखंडची सुरुवात काही खास झाली नाही. आघाडीचे चार फलंदाज ११४ धावांवर माघारी परतले. मोहम्मद नजीम ( २४), उत्कर्ष सिंग ( ३) , कुमार सुरज ( २८) व कर्णधार विराट सिंग ( ३०) हे लगेच माघारी परतले. सौरभ तिवारी व इशान किशन यांनी झारखंडचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी केली.
सौरभने २२९ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. सौरभच्या विकेटनंतर झारखंडचे फलंदाज पुन्हा झटपट बाद होताना दिसले. पण, इशान खिंड लढवत राहिला. त्याने १९५ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १३२ धावांची खेळी केली. झारखंडला पहिल्या डावात ३५० धावाच करता आल्या आणि केरळने १२५ धावांची आघाडी घेतली आहे.
वन डे क्रमवारीत इशानची भरारी... इशान किशनने ऐतिहासिक २१० धावांची खेळी केली आणि आयसीसी क्रमवारीत त्याचा चांगला फायदा झाला आहे. या द्विशतकाआधी ११७ व्या स्थानी होता आणि आता त्याने ३७ व्या स्थानी झेप घेतली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"