भारतीय संघाचा स्टार विकेट किपर बॅटर इशान किशन याने दुलिप करंडक स्पर्धेतील शतकी खेळीसह दमदार पदार्पण केले आहे. देशांतर्गत स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत भारत 'क' संघाचे प्रतिनिधीत्व करताना भारत ब विरुद्धच्या लढतीत त्याने १२६ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १४ षटकारांसह ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
शतकी खेळीनंतर शाब्दिक खेळातून चर्चेत आलाय इशान
शतकी खेळीच्या माध्यमातून टिकाकारांना प्रत्युतर दिल्यानंतर इशान किशन याने आता सोशल मीडियावरील दोन शब्दांतील खास पोस्टनं लक्ष वेधून घेतलं आहे. मॅच संपल्यावर इशान किशन याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने Unfinished business अशी कॅप्शन दिली आहे. या दोन शब्दांमुळे त्याची पोस्ट चर्चेत आली आहे. टीम इंडियात एन्ट्री मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशाच अर्थानं त्याने ही पोस्ट शेअर केल्याचे दिसते. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते.
असा असेल त्याचा टीम इंडियातील कमबॅकचा मार्ग
दुलिप करंडक स्पर्धेतील शतकी खेळीसह इशान किशन याने पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळणं तसं अवघडच आहे. पण याच संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून तो टीम इंडियात कमबॅक करू शकतो. जर रिषभ पंतला बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली तर तो विकेट किपर बॅटरच्या रुपात टीम इंडियातील पहिली पसंती ठरेल, असे वाटते. आगामी टी-२० मालिकेतून शुबमन गिल विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे जरी पंत खेळला तरी या परिस्थितीत बॅटरच्या रुपातही त्याला संधी मिळू शकते.
त्याला मनमानी कारभार चांगलाच नडला
चुकीच्या वर्तनामुळे इशान किशन याच्यावर बीसीसीआयच्या वार्षिक करारातून गायब होण्याची वेळ आली. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील मालिकेतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. पण त्याने तो सल्ला काही मनावर घेतला नाही. परिणामी बीसीसीआयच्या वार्षिक करारातू त्याचा पत्ताच कट करण्यात आला.