Ishan Kishan T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या T20 क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशनने (Ishan Kishan) फलंदाजांच्या यादीत 68 स्थानांनी झेप घेतली आहे. आता तो या क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांचंही स्थान सुधारलं आहे.
इशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या घरच्या टी-20 मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 164 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो T20I मधील फलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये प्रवेश करू शकला आहे. टॉप 10 मध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४ व्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी इशान किशन टी-20 क्रमवारीत 75व्या क्रमांकावर होता. मात्र केवळ तीन सामन्यांत त्याने जबरदस्त कामगिरी केली आणि सातव्या त्यानं सातव्या क्रमांकावर झेप घेतली. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे, तर श्रीलंकेच्या महेश तिक्ष्णाने आठव्या स्थानावर झेप घेतली.
कसोटी फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप मालिकेत सलग दुसरे शतक झळकावल्यानंतर इंग्लंडच्या जो रूटने अव्वल स्थान पटकावले आहे.